Traffic Rules Enforcement: देशभरात वाढते रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंच्या चिंताजनक आकडेवारीची सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना वाहतूक नियम अधिक कठोरपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करणे आणि वाहनांवरील डोळे दिपवणाऱ्या प्रखर एलईडी (LED) लाईट्सवर बंदी घालण्याचे महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत.
वाढते अपघात चिंताजनक – सुप्रीम कोर्ट
रस्त्यांवरील वाढते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू हे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या अपघातांमागे वाहतूक नियमांचे पालन न करणे हे एक प्रमुख कारण असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. याच संदर्भात, न्यायालयाने रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
सुप्रीम कोर्टाचे प्रमुख आदेश:
-
हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी: दुचाकीचालक आणि मागे बसणाऱ्या सहप्रवाशासाठी हेल्मेट सक्तीच्या नियमाची कठोरपणे अंमलबजावणी करावी.
-
प्रखर लाईट्सवर बंदी: वाहनांवर अनधिकृतपणे बसवण्यात येणारे प्रखर एलईडी (LED) लाईट्स, जे समोरील वाहनचालकाच्या डोळ्यांवर येतात, ते बंद करावेत.
-
भोंगे आणि दिव्यांवर कारवाई: वाहनांवर बेकायदेशीरपणे लावलेले लाल-निळे दिवे आणि भोंगे तात्काळ काढून टाकावेत.
-
गैरप्रकार रोखा: अशा दिव्यांचा बेकायदा वापर, त्यांची विक्री आणि गैरप्रकार कठोरपणे रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-
हायवेवर कॅमेऱ्यांचा वापर: रस्ते आणि महामार्गावरील कॅमेऱ्यांच्या मदतीने नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी.
-
महामार्ग प्राधिकरणाला सूचना: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देखील सुरक्षेचे उपाय कठोरपणे योजावेत.
कोल्हापुरात कारवाईचा इशारा
अनेक शहरांमध्ये, विशेषतः कोल्हापूरसारख्या ठिकाणी, वाहनांना मूळ कंपनीने दिलेल्या दिव्यांऐवजी फॅशन म्हणून विविध रंगांचे आणि अत्यंत प्रखर एलईडी लाईट्स बसवण्याचा ट्रेंड वाढला आहे. हे अतिरिक्त लाईट्स लावणे अनधिकृत असून त्यामुळे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता दिसत नाही आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) अशा अनधिकृत लाईट्स लावणाऱ्या वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.