लाडक्या बहिणींना दिवाळीचा हप्ता मिळणार का? मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मंत्री अदिती तटकरें: राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात हप्ता मिळावा यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी, सध्या पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याला शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाल्या अदिती तटकरे?

“सध्याच्या पूरपरिस्थितीमध्ये नुकसानग्रस्त भागाला अधिकाधिक आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याला शासनाचे प्राधान्य आहे,” असे अदिती तटकरे म्हणाल्या. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता देण्यात यावा. विभागाकडून आम्ही ती प्रक्रिया मान्यतेसाठी दिलेली आहे आणि निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे.”

हप्ता कधी मिळणार?

दिवाळीपूर्वी हप्ता मिळेल का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. “ज्या क्षणाला निधी प्राप्त होईल, त्या वेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू. सणासुदीच्या कालावधीत जर ती (मंजुरी) आली, तर आम्हाला आनंदच आहे. पण ती जशी येईल, तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.

नुकसान भरपाईला प्राधान्य

तटकरे यांनी जोर देऊन सांगितले की, शासन म्हणून नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची १०० टक्के भरपाई करणे शक्य नसते, परंतु बाधित कुटुंबांना आधार देणे आणि त्यांचे जीवन पूर्वपदावर आणणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि चक्रीवादळासारखी संकटे येतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यावर सरकारचा अधिक भर असल्याचे त्यांनी सूचित केले.

या योजनेअंतर्गत राज्यात सुमारे २ कोटी ३५ लाखांपेक्षा जास्त महिला लाभार्थी आहेत. प्राप्तिकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अडीच लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या काही महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

Leave a Comment