राज्यात पुढील चार दिवस पावसाचे सावट; हवामान बदलामुळे रब्बी पेरण्यांवर परिणाम होण्याची शक्यता डॉ. रामचंद्र साबळे

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, ‘ला निना’चा प्रभाव; शेतकऱ्यांनी पिकांची काढणी आणि पेरणी हवामानाचा अंदाज घेऊनच करावी, असे आवाहन.

विशेष प्रतिनिधी:

ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी राज्यात बुधवार, १५ ऑक्टोबर ते शनिवार, १८ ऑक्टोबर या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच ‘ला निना’च्या प्रभावामुळे हवामानात बदल झाला असून, पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले. हा मान्सूनोत्तर पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी शेतीकामांचे नियोजन हवामानाचा अंदाज घेऊनच करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

डॉ. साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रावरील हवेचा दाब कमी (सुमारे १००६ हेक्टापास्कल) राहणार आहे. त्याचबरोबर बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरातील पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने बाष्पनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. याउलट, प्रशांत महासागरात ‘ला निना’चा प्रभाव सक्रिय असून, पेरूजवळ समुद्राचे पाणी थंड (१४ अंश सेल्सिअस) झाले आहे. या हवामान बदलांमुळे बाष्पयुक्त वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत, ज्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

विभागनिहाय पावसाचा अंदाज

येत्या चार दिवसांत कोकणात हलक्या स्वरूपाचा, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर नसेल, तर ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी होईल, त्याच ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला

या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीकामांचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • सोयाबीन काढणी: ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी बाकी आहे, त्यांनी पावसाची उघडीप पाहूनच काढणी आणि मळणीची कामे उरकून घ्यावीत. काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ढीग करून ताडपत्रीने झाकावा, जेणेकरून पावसापासून नुकसान टाळता येईल.

  • रब्बी पेरणी: रब्बी पिकांच्या पेरणीसाठी घाई करू नये. जमिनीत योग्य ओलावा (वाफसा) आल्यानंतरच पेरणी करावी. हरभरा आणि करडई या पिकांची पेरणी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान करणे उत्तम राहील, तर गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरच्या सुमारास करणे अधिक फायदेशीर ठरेल.

  • इतर पिके: फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार फुलांची काढणी करून ती त्वरित बाजारात विक्रीसाठी पाठवावी. तसेच, पूर्वहंगामी उसाच्या लागवडीसाठी सध्याचा काळ योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिवाळीत पाऊस येणार? थंडीचा कडाका वाढणार

अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीत पावसाच्या शक्यतेबद्दल विचारणा केली आहे. त्यावर डॉ. साबळे यांनी सांगितले की, दिवाळीच्या (२१-२३ ऑक्टोबर) काळात महाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढून १०१० हेक्टापास्कलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, यंदा ‘ला निना’च्या प्रभावामुळे थंडीचा कडाका अधिक जाणवेल, जो गव्हाच्या पिकासाठी अत्यंत अनुकूल राहील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

Leave a Comment